१९५६ साली, मुंबईच्या सीमेलगत असलेल्या एका छोट्याशा गावात — मालाडमध्ये — शिक्षणाच्या दीपस्तंभाचे रोपटे रोवले गेले. ३ जून १९५६ रोजी, ‘शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड’ या संस्थेची स्थापना झाली, आणि एका महान सामाजिक कार्याची पायाभरणी झाली.
या कार्यासाठी समाजाचे अनेक कर्तृत्ववान, दूरदृष्टी असलेले धुरीण एकवटले. त्यांनी केवळ वेळ आणि श्रमच नव्हे, तर प्रसंगी स्वतःची पदरमोड करत ही संस्था उभी केली. संस्थेचे आधारस्तंभ ठरलेले काही थोर पुरुष म्हणजे श्री. भा. रा. देवल (वकील), डॉ. आ. वि. फडके, डॉ. व. त्र्यं. जोशी, डॉ. ह. त्रिं. जोगळेकर, ॲड. बळवंत मंत्री, श्री. मंगेश राजाध्यक्ष, श्री. अनंत भुलेस्कर, श्री. देसाई, श्री. रामराव चोगले, श्री भालचंद्र मंत्री, श्री. वसंतराव मराठे, श्री. तु. बा. नार्वेकर, श्री. श्री. ग. वैद्य, श्री. द. शं. जोशी, डॉ. र. ना. सबनीस, श्री. दारशेतकर, डॉ. मधुसूदन वाकणकर, श्री. श. दा. पेडणेकर आणि संस्थेच्या स्थिरस्थावर झाल्यानंतर च्या काळात – श्री. शरदचंद्र अणकईकर, श्री. य. पु. मोने, श्री. प्र .गो. मेहेंदळे, श्री. अ. गो. भोकरे ही सर्व केवळ नावे नव्हे, तर संस्थेच्या इतिहासात कोरलेली अमूल्य सुवर्णाक्षरे आहेत. या थोर व्यक्तींनी संस्थेला केवळ आकार दिला नाही, तर तिच्या वाटचालीला दिशा व ओळखही दिली.
मराठी माध्यमाची दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून उत्कर्ष मंदिर शाळेचे नाव गाजविण्यात वास्तूच्या पायाचे दगड ठरलेली अशी ही कर्तृत्ववान मंडळी होत. त्या काळात मालाड गाव रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी झपाट्याने विकसित होत होते. लोकसंख्येचा विस्तार होत असतानाच, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची तीव्र मागणी जाणवू लागली.
ही गरज ओळखून, संचालक मंडळाने १९६८ साली मालाड पूर्वेतील पुष्पा पार्क येथे दुसऱ्या शाळेचा शुभारंभ केला — तोही संस्थेच्या स्वतःच्या वास्तूत! दरम्यान, मालाड पश्चिमेतील शाळाही विद्यार्थ्यांनी गजबजून गेली होती.
१९८० च्या सुमारास, शाळेचा विस्तार करत एक सुशोभित सभागृह आणि विस्तीर्ण मैदान उपलब्ध करून देण्यात आले, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून श्री मंगेश राजाध्यक्ष आणि श्री. म.ज. फडके यांनी फारच मोलाचे काम करून उत्कर्ष मंदिर च्या देदीप्यमान कामगिरीची पायाभरणी केली. अतिशय समर्पित अशा वृत्तीचे ज्ञानी गुरुजन उत्कर्ष मंदिर शाळेला सातत्याने लाभले आणि त्यांनी कर्तृत्ववान विद्यार्थ्यांची घडण अखंडपणे केली.
आज शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड आणि मंडळ संचालित उत्कर्ष मंदिर शाळा म्हणजे एक केवळ संस्था नाही, तर ती दृष्टी, निष्ठा आणि सेवाभावाने जोपासलेली मराठी माध्यमातील शैक्षणिक चळवळ आहे, जी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे उज्ज्वल भविष्य घडवत आहे.
काही प्रश्न आहेत किंवा मदत हवी आहे ?
आम्ही मदत करण्यासाठी येथे आहोत आणि तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
ईमेल किंवा फोनद्वारे कधीही आमच्याशी संपर्क साधा..